भराडी येथे संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा
सिल्लोड, (प्रतिनिधी): सेवा धर्माची उपासना करण्यासाठी भीष्माचार्यांनी मृत्युलोकात नाभिक समाजात संत सेना महाराजांच्या रूपाने जन्म घेतला, अशी संत परंपरेतील आख्यायिका आहे. मृत्युलोकात काला केला जात नाही, मात्र या काल्याचा प्रसाद मिळविण्यासाठी गोकुळात भगवान श्रीकृष्णासोबत सवंगडी होते. तसेच वाळवंटात झालेल्या काल्याच्या प्रसंगी भगवंत वारकऱ्यांसोबत उपस्थित होते, अशा शब्दांत काल्याचा महिमा ह.भ.प. बाबुराव महाराज बिडवे यांनी कथन केला.
भराडी (ता. सिल्लोड) येथे संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित तीन दिवसीय हरिनाम सप्ताहात काल्याच्या कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह. भ. प. बाबुराव महाराज बिडवे यांनी आपल्या रसाळ व ओघवत्या वाणीने संत सेना महाराजांच्या जीवनकार्याचे महत्त्व आणि वारकरी संप्रदायातील काल्याचे आध्यात्मिक स्थान उपस्थित भाविकांना समजावून सांगितले.
संत सेना महाराजांनी सेवा, भक्ती आणि समतेचा संदेश समाजाला दिला. त्यांच्या कार्यातून नाभिक समाजासह सर्व समाजघटकांना भक्तीमार्गाची प्रेरणा मिळते. काला हा केवळ धार्मिक विधी नसून भक्त आणि भगवंत यांच्यातील आत्मीय नाते दृढ करणारा सोहळा असल्याचे महाराजांनी सांगितले.
या धार्मिक कार्यक्रमास मुरडेश्वर संस्थानचे पीठाधीश काशिगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी ह. भ. प. विद्यानंद सरस्वती महाराज, महामंडलेश्वर मंगरूळकर शास्त्री महाराज ह भ प बाळापुरकर महाराज ह भ प सचिन महाराज पवार (नेवासा) महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे मराठवाडा कार्याध्यक्ष दादासाहेब काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय परिसरातील नाभिक समाजातील प्रतिष्ठित नागरिक, नेवासा समाज बांधव तालुकाध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, सुदाम शिंदे, कृष्णा चाँडवले, कांता घोडके, लक्ष्मण राऊत, बालाजी पांडव, रत्नाकर बिडवे, हरिभाऊ बिडवे, राजेश पांडव, संजय बिडवे, दतात्रय बिडवे, शेषराव बिडवे, रघुनाथ बिडवे, दीपक बिडवे, सुधाकर बिडवे, भरत बिडवे, अरुण बिडवे, राजेश बिडवे, सदाशिव पांडव, अनिल बिडवे यांच्यासह वारकरी, महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या काल्याच्या कीर्तन सोहळ्याने भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळाली. या नंतर काला आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.















